Close Visit MahaNews12

ESIC योजनेचा मोठा फायदा! कर्मचाऱ्यांना मोफत उपचार, 6 महिन्यांचा पगार, अपंगत्वावर 90% वेतन; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC – Employees’ State Insurance Corporation) ही अत्यंत महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीत चालणाऱ्या या योजनेअंतर्गत विमाधारक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा, आर्थिक मदत, प्रसूती लाभ, अपंगत्व भरपाई तसेच मृत्यूनंतर कुटुंबाला पेन्शनसारखे अनेक लाभ दिले जातात.

कोणाला मिळतो ESIC योजनेचा लाभ?

ज्या दुकाने, आस्थापना किंवा कंपन्यांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, तेथे ही योजना लागू होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याचे मासिक वेतन ₹21,000 पर्यंत असणे आवश्यक आहे. तर दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ही वेतनमर्यादा ₹25,000 ठेवण्यात आली आहे.

योजनेअंतर्गत सध्या कर्मचाऱ्याच्या वेतनातून 0.75 टक्के आणि नियोक्त्याकडून 3.25 टक्के योगदान भरले जाते. हे योगदान नियमांनुसार वेळोवेळी बदलू शकते.

नोकरी बदलली तरी ESIC क्रमांक कायम

कर्मचारी नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्याची ESIC अंतर्गत नोंदणी केली जाते आणि त्याला विमा कार्ड दिले जाते. विशेष म्हणजे, कर्मचारी नोकरी बदलल्यास त्याचा ESIC क्रमांक बदलत नाही. नवीन कंपनीमध्ये तोच क्रमांक वापरून लाभ सुरू ठेवता येतो.

ESIC अंतर्गत मिळणारे महत्त्वाचे लाभ. Employees State Insurance Corporation

ESIC योजनेअंतर्गत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ESIC रुग्णालयांमध्ये मोफत उपचार दिले जातात. गंभीर आजारासाठी खासगी रुग्णालयात रेफर केल्यास उपचाराचा संपूर्ण खर्च ESIC उचलते.

कर्मचारी गंभीर आजारामुळे काम करण्यास असमर्थ ठरल्यास त्याला पगाराच्या 70 टक्के रक्कम आर्थिक सहाय्य म्हणून दिली जाते. अपघातामुळे किंवा इतर कारणांमुळे अपंगत्व आल्यास 90 टक्के वेतन देण्याची तरतूद आहे. कायमस्वरूपी अपंगत्व झाल्यासही आजीवन 90 टक्के वेतनाच्या समतुल्य लाभ मिळू शकतो.

महिला कर्मचाऱ्यांसाठीही ESIC योजना लाभदायी आहे. प्रसूती रजेदरम्यान 6 महिन्यांचे वेतन दिले जाते. तसेच गर्भपात झाल्यास 6 आठवड्यांची विशेष रजा देण्याची तरतूद आहे.

याशिवाय, विमाधारक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पेन्शनचा लाभ मिळण्याचीही व्यवस्था या योजनेत करण्यात आली आहे.

ESIC ही केवळ आरोग्य विमा योजना नसून, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक व सामाजिक सुरक्षा देणारी महत्त्वाची योजना मानली जाते.

Leave a Comment

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!