Close Visit MahaNews12

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 50 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मरणोत्तर कर्जमाफी; 14 लाखांहून अधिक कर्जदार अपात्र

मुंबई :  Farmer Loan Waiver 2026 राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत मोठी माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 50 हजार 806 मृत शेतकऱ्यांना मरणोत्तर कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये आत्महत्याग्रस्त मराठवाडा आणि अमरावती विभागातील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.

दरम्यान, या योजनेच्या निकषांनुसार लोकप्रतिनिधी, सरकारी व निमसरकारी कर्मचारी तसेच विविध संस्थांमधील कर्मचाऱ्यांना कर्जमाफीपासून वगळण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार तब्बल 14 लाख 66 हजार कर्जदार शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत.

36 हजार कोटींची कर्जमुक्ती योजना

राज्य सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सुमारे 36 हजार कोटी रुपयांची अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे.

या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जावर दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांसाठीही तरतूद

ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठीही योजनेत विशेष तरतूद करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्याने दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असलेली रक्कम स्वतःच्या हिश्श्यातून बँकेत भरल्यानंतर एकवेळ समझोता योजनेअंतर्गत सरकारकडून दोन लाख रुपये कर्जखात्यात जमा केले जाणार आहेत.

मराठवाड्यात सर्वाधिक मृत शेतकऱ्यांना लाभ. Farmer Loan Waiver 2026

मरणोत्तर कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या 50 हजार 806 शेतकऱ्यांमध्ये विविध विभागांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार मराठवाड्यात 18 हजार 723, अमरावती विभागात 11 हजार 946, नाशिक विभागात 7 हजार 639, पुणे विभागात 6 हजार 322, नागपूर विभागात 4 हजार 609, तर कोकण विभागात 1 हजार 567 शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

14.66 लाख कर्जदार शेतकरी योजनेतून बाहेर

कर्जमाफीच्या निकषांनुसार मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह 2 हजार 88 लोकप्रतिनिधी योजनेतून वगळण्यात आले आहेत. याशिवाय सरकारी अधिकारी-कर्मचारी, विविध महामंडळांमधील कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी आणि सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांचाही अपात्र यादीत समावेश आहे.

एकूण 14 लाख 66 हजार कर्जदार शेतकरी या निकषांमुळे कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. त्याचबरोबर 94 हजार प्राप्तिकर भरणारे शेतकरी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.

कर्जमाफीसाठी 31 लाखांहून अधिक खात्यांची माहिती अपलोड

सरकारच्या कर्जमाफी पोर्टलवर विविध बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. 12 राष्ट्रीयीकृत बँकांनी 16 लाख, 30 जिल्हा बँकांनी 10 लाख, 10 खासगी बँकांनी 47 हजार आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 4 लाख 70 हजार कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर दिली आहे.

अशा प्रकारे एकूण 31 लाख 24 हजार कर्जदार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

शेतकरी कर्जमाफीचा लाभ नेमका कोणाला?

या योजनेत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत पीक कर्जाच्या मर्यादेनुसार लाभ मिळणार आहे. मात्र, योजनेतील पात्रता निकषांमध्ये येणारे लोकप्रतिनिधी, सरकारी व संबंधित संस्थांमधील कर्मचारी तसेच प्राप्तिकर भरणारे शेतकरी यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.

दरम्यान, 50 हजारांहून अधिक मृत शेतकऱ्यांना मरणोत्तर कर्जमाफी मिळाल्यामुळे या योजनेची व्याप्ती आणि शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Leave a Comment

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!