मुंबई : Government Employee Insurance : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय समोर आला आहे. महामंडळ प्रशासनाने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सोबत केलेल्या करारानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपघात व नैसर्गिक मृत्यू विमा योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन खाते SBI मध्ये असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जळगाव विभागाने 20 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन खाते अद्याप SBI मध्ये नसल्यामुळे त्यांना या विमा योजनेचा लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे सर्व आगार व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांची वेतन खाती तातडीने SBI मध्ये सुरू करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महामंडळ आणि SBI यांच्यातील करारानुसार, कर्मचाऱ्यांच्या नैसर्गिक मृत्यूच्या घटनेत वारसांना ₹6 लाख, तर अपघाती मृत्यू झाल्यास तब्बल ₹1 कोटींचे विमा संरक्षण मिळणार आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी कर्मचाऱ्यांना कोणतेही अतिरिक्त प्रीमियम भरावा लागणार नाही.
ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन खाते इतर बँकांमध्ये आहे, त्यांनी शक्य तितक्या लवकर SBI मध्ये खाते सुरू करून वेतन जमा होईल याची खात्री करावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच SBI मध्ये खाते असूनही त्यामध्ये वेतन जमा होत नसेल किंवा खाते निष्क्रिय असेल, तर संबंधित शाखेशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महामंडळाने सर्व आगार प्रमुखांना आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती तपासून आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यभरातील एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही विमा योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, पात्र कर्मचाऱ्यांनी वेळेत SBI मध्ये वेतन खाते सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
