मुंबई | प्रतिनिधी : Maharashtra Pension News : राज्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी वित्त विभागाने 14 जुलै 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, निवृत्तीवेतनासाठी बँकेत संयुक्त खाते (Joint Account) उघडल्यानंतर सादर कराव्या लागणाऱ्या शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची सक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक व प्रशासकीय दिलासा मिळणार आहे.
शासनाच्या विचाराधीन असलेल्या या प्रस्तावाला अखेर मंजुरी देण्यात आली असून, आता संबंधित शपथपत्र साध्या कागदावर सादर करता येणार आहे. यामुळे स्टॅम्प पेपर खरेदीची आवश्यकता राहणार नसल्याने प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होणार आहे.
या शासन निर्णयात 19 जून 2013 रोजीचा पूर्वीचा शासन निर्णय रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शासकीय कार्यालयात सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रांबाबतच्या पूर्वीच्या मुद्रांक शुल्कासंदर्भातील तरतुदींमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. Maharashtra Pension News
नवीन नियमानुसार, निवृत्तीवेतनधारकांनी संयुक्त बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेले शपथपत्र साध्या कागदावर भरून अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच राज्यातील सर्व कोषागार कार्यालयांमध्ये सादर करता येणार आहे. ही नवीन व्यवस्था 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे निवृत्तीवेतनधारकांची कागदपत्रांची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून, अनावश्यक खर्च आणि वेळेची बचत होणार आहे. वित्त विभागाच्या या निर्णयाचे निवृत्तीवेतनधारकांकडून स्वागत करण्यात येत आहे.