Close Visit MahaNews12

एनपीएस व एकीकृत निवृत्ती वेतन योजनेतील अंशदान प्रान खात्यात वेळेत जमा करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती जाहीर

एनपीएस व एकीकृत निवृत्ती वेतन योजनेतील अंशदान प्रान खात्यात वेळेत जमा करण्यासाठी सुधारित कार्यपद्धती जाहीर.

मुंबई : Pension Contribution :  राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) तसेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना (UPS) अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रान (PRAN) खात्यात मासिक अंशदानाची रक्कम वेळेत जमा होण्यासाठी वित्त विभागाने दि. 11 जून 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार अंशदानाच्या रकमा प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रान खात्यात जमा होण्यासाठी सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

शासन निर्णयानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली तसेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांची वेतन देयके प्राधान्याने पारित करण्यात येणार आहेत. त्यानंतर ई-कुबेर प्रणालीद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतनाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. यासाठी प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेपर्यंत वेतन देयकांशी संबंधित प्रमाणक क्रमांक प्रणालीमध्ये संस्कारित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच वेतन देयकांवर “Not Payable Before the First Day of the Next Month or Due Date” असा शेरा नोंदवून वेतनाची रक्कम पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा नियोजित देय दिनांकाला अदा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे वेतन वितरण आणि अंशदान जमा करण्याची प्रक्रिया अधिक सुसूत्र व वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

याशिवाय राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत शासनाच्या 14 टक्के नियोक्ता अंशदानासह कर्मचाऱ्यांच्या अंशदानाच्या देयकांसाठी तसेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना अंतर्गत 10 टक्के अंशदान आणि नियोक्ता अंशदानाच्या रकमेच्या देयकांसाठी ई-बिल सेवार्थ प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा व विकसन करण्यात आले आहे.

या सुधारित कार्यपद्धतीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रान खात्यात अंशदान वेळेत जमा होण्यास मदत होणार असून निवृत्तीवेतनाशी संबंधित आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक, सुलभ आणि कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!