Close Visit MahaNews12

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; ११ प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाची सकारात्मक भूमिका

मुंबई :MSRTC NEWS UPDATE : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन आणि मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक १८ ऑगस्ट रोजी पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली असून, काही मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.

महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीतील फरकाचा प्रश्न परिवहनमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. तसेच स्थानिक पूरक भत्ता, धुलाई भत्ता आदी प्रश्नांवरही पाठपुरावा केला जाणार आहे.

सेवेत असताना अपंगत्व, विकलांगता किंवा रंगांधळेपणामुळे अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना पर्यायी नोकरी देण्याबाबतही सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

हजेरी प्रोत्साहन भत्त्याच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. या भत्त्यामध्ये कारागीर ‘क’, सहाय्यक आणि स्वच्छक या पदांचा समावेश करण्यासाठी निर्णयाची टिपणी सादर केली जाणार आहे.

चालक, वाहक, सहाय्यक तसेच तत्सम पदांवरील कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक पदावर बढती देण्याबाबत विभागांना कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या विभागांमध्ये अद्याप प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्या विभागांना स्मरणपत्र देण्यात येणार आहे. Msrtc update

सन २००७ आणि २००९ मध्ये निवड झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरही संघटनेने मागणी मांडली. याबाबतची टिपणी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे सादर केली जाणार आहे.

शिस्त व आवेदन पद्धतीमध्येही सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मान्यताप्राप्त संघटनेशी चर्चा करून एका महिन्यात सुधारित शिस्त व आवेदन पद्धती लागू करण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.

दरम्यान, सांगली, रायगड, परभणी, मध्यवर्ती कार्यशाळा आणि दापोडी येथील प्रलंबित प्रश्नांवर संबंधित विभागांना आवश्यक आदेश देण्यात येणार आहेत. तसेच निवडश्रेणी आणि श्रेणीकरणाच्या वेळी कर्मचाऱ्यांना विकल्पाची माहिती देऊन, त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचेही ठरले आहे.

याशिवाय टी.टी.एस. टू टी.एस. करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

या बैठकीत कामगारांच्या अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने प्रलंबित मागण्यांना आता गती मिळण्याची शक्यता आहे. कामगारांच्या हक्कांसाठी पुढेही सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने घेतली आहे.

Leave a Comment

📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!