राज्य कर्मचाऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे शासन निर्णय जारी. Maharashtra Government
मुंबई : प्रतिनिधी
Maharashtra Government : राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि. 19 जून 2026 रोजी शासनाने तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केले आहेत. वित्त विभाग, महसूल व वन विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून हे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.
वित्त विभागाने लेखा व कोषागारे संचालनालयाच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील दूरध्वनी चालक, लघुलेखक निम्नश्रेणी, लघुलेखक उच्चश्रेणी व लघूटंकलेखक या संवर्गातील पदांना मृत संवर्ग घोषित करण्यास मंजुरी दिली आहे.
दरम्यान, महसूल व वन विभागाने अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त वेतनासंबंधीचे प्रस्ताव विहित कालावधीत शासनाकडे सादर करण्याबाबत निर्देश दिले आहेत. यामुळे प्रलंबित प्रस्तावांच्या निपटाऱ्यास गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
तसेच, सामान्य प्रशासन विभागाने भाप्रसे (IAS) अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या अंतिम प्रदान रकमेसंबंधीचे प्रस्ताव ‘सेवार्थ’ प्रणालीद्वारे महालेखापाल कार्यालयाकडे सादर करण्यास मंजुरी दिली आहे.
या तीनही निर्णयांमुळे राज्य प्रशासनातील विविध विभागांच्या कामकाजात सुसूत्रता येण्यास मदत होणार असून अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक प्रशासकीय बाबींना स्पष्टता मिळणार आहे.