राज्यातील या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! महागाई भत्ता 58%, तर घरभाडे भत्ता व वेतनवाढीत ही भरघोस वाढ; आंदोलन मागे
मुंबई | प्रतिनिधी
राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी (दि. 23 जून) विधानसभा आणि विधानपरिषदेत केली.
याबाबत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असून गेली आठ दशके राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुर्गम भागातील नागरिकांना अखंड सेवा देत आहे. या सेवेच्या केंद्रस्थानी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.
शासनाच्या निर्णयानुसार एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 58 टक्के करण्यात आला आहे. तसेच घरभाडे भत्ता 8-16-24 टक्क्यांवरून 10-20-30 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय वार्षिक वेतनवाढीचा दर 2 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे एसटी महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी हा खर्च आवश्यक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5 हजार 649 कोटी रुपये अदा करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शासनाच्या या सकारात्मक निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी 29 जून 2026 रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.