मुंबई : UPS Pension Scheme Update राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) आणि एकीकृत निवृत्ती वेतन योजना (UPS) अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वित्त विभागाने ११ जून २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, कर्मचाऱ्यांच्या PRAN खात्यात मासिक अंशदानाची रक्कम वेळेत जमा व्हावी यासाठी सुधारित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.
नवीन प्रणालीअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या PRAN खात्यात अंशदान जमा होईल, यासाठी आवश्यक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अंशदान जमा होण्यास होणारा विलंब टाळला जाणार असून कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निधीचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे.
शासन निर्णयानुसार, NPS आणि UPS अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांना प्राधान्याने मंजुरी दिली जाणार आहे. तसेच ई-कुबेर प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतन जमा करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या २२ तारखेपर्यंत वेतन देयकांचे प्रमाणक क्रमांक संस्कारित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याशिवाय, वेतन देयकांवर “Not Payable Before the First Day of the Next Month or Due Date” असा शेरा नोंदवून पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा देय दिनांकाला वेतन अदा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शासनाने ई-बील आणि सेवार्थ प्रणालीमध्येही आवश्यक बदल पूर्ण केले आहेत. त्यानुसार NPS अंतर्गत १४ टक्के नियोक्ता अंशदान आणि UPS अंतर्गत १० टक्के कर्मचारी अंशदान तसेच संबंधित देयके वेळेत प्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. UPS Pension Scheme Update
या सुधारित कार्यपद्धतीमुळे PRAN खात्यात अंशदान वेळेवर जमा होईल, आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन निधीचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा शासनाने व्यक्त केली आहे.