Close Visit MahaNews12

SIR अर्जांवर शिक्षकांचे मोबाईल क्रमांक; मध्यरात्रीपर्यंत फोन, शिक्षकांकडून तीव्र नाराजी

SIR अर्जांवर शिक्षकांचे मोबाईल क्रमांक; मध्यरात्रीपर्यंत फोन, शिक्षकांकडून तीव्र नाराजी

मुंबई | प्रतिनिधी : SIR Maharashtra 2026 : राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी (SIR) मोहिमेदरम्यान शिक्षकांसमोर आता नव्याने गोपनीयता आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एसआयआर अर्जांवर नियुक्त शिक्षकांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांक छापण्यात आल्याने त्यांना दिवसभरच नव्हे तर मध्यरात्रीपर्यंत मतदार, राजकीय कार्यकर्ते आणि अनोळखी व्यक्तींचे सातत्याने फोन येत असल्याची तक्रार समोर आली आहे. या प्रकारामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, वैयक्तिक क्रमांक अर्जावर छापण्याची पद्धत तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिक्षक संघटनांच्या म्हणण्यानुसार, एसआयआर मोहिमेची जबाबदारी पार पाडताना शिक्षकांना आधीच अध्यापन आणि निवडणूक कामाचा दुहेरी ताण सहन करावा लागत आहे. अशातच अर्जांवर वैयक्तिक संपर्क क्रमांक प्रसिद्ध झाल्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सातत्याने फोन येत असून, त्याचा अध्यापनावरही परिणाम होत आहे.

वर्गातही फोनचा व्यत्यय

मतदार नोंदणी, अर्ज, नावांची पडताळणी आणि इतर माहितीसाठी शिक्षकांना सतत फोन येत असल्याचे सांगितले जात आहे. अनेकदा वर्गात अध्यापन सुरू असतानाही फोनची रिंग वाजत असल्याने शिक्षकांना अध्यापनात अडथळे निर्माण होत आहेत. फोन न उचलल्यास संबंधितांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या जात असल्याने शिक्षकांवर अतिरिक्त मानसिक ताण वाढत असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.

महिला शिक्षकांच्या सुरक्षेचाही प्रश्न

विशेषतः महिला शिक्षकांना रात्री उशिरापर्यंत अनोळखी व्यक्तींचे फोन येत असल्याने सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वैयक्तिक मोबाईल क्रमांक सार्वजनिक झाल्यामुळे अनेक शिक्षकांनी चिंता व्यक्त केली असून, यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी पुढे आली आहे.

आयोगाकडे कारवाईची मागणी

महाराष्ट्र शिक्षक सेनेने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारकडे एसआयआर अर्जांवर शिक्षकांचे वैयक्तिक संपर्क क्रमांक छापण्याची पद्धत तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. याऐवजी अधिकृत हेल्पलाइन किंवा कार्यालयीन संपर्क क्रमांक उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून शिक्षकांच्या गोपनीयतेचे संरक्षण होईल आणि अध्यापनाच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Leave a Comment

add_filter('the_content', function ($content) { if (!is_single()) return $content; $social = '
📢 जॉईन करा
';      
error: Content is protected !!