राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित ; यापुढे दक्षता घेण्याच्या सुचना परिपत्रक जारी
मुंबई : सरकारी कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक समारंभ साजरे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत महसूल व वन विभागामार्फत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
परिपत्रकानुसार, काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत वाढदिवसासारखे वैयक्तिक समारंभ साजरे करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होतो तसेच कामानिमित्त कार्यालयात आलेल्या नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. अशा प्रकारचे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 नुसार योग्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांच्या कार्यालयासह अधिनस्त सर्व कार्यालयांमध्ये यापुढे कार्यालयीन वेळेत कोणताही वैयक्तिक समारंभ साजरा केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक समारंभ कार्यालयात साजरे झाल्याचे आढळल्यास संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी तात्काळ समज देऊन भविष्यात अशा प्रकारच्या अनुचित घटना घडणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
महत्त्वाचे मुद्दे :
- कार्यालयीन वेळेत वाढदिवस किंवा वैयक्तिक समारंभांना बंदी.
- नागरिकांच्या कामकाजात अडथळा येऊ नये, यासाठी निर्णय.
- महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 नुसार कारवाईचा इशारा.
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार.