मुंबई : Employee Provident Fund कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ (PF) काढण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. आता बहुतेक PF दावे 24 ते 48 तासांत निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, काही प्रकरणांमध्ये त्याच दिवशी दावा मंजूर करून रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे. याशिवाय, लवकरच UPI द्वारे थेट बँक खात्यात PF रक्कम जमा करण्याची सुविधाही सुरू होणार आहे.
आता 24 ते 48 तासांत PF क्लेमचा निपटारा
नवी दिल्ली येथे आयोजित ग्लोबल इंडस्ट्रियल रिलेशन्स समिटमध्ये EPFO चे केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त (CPFC) रमेश कृष्णमूर्ती यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संस्थेचे लक्ष्य नवीन PF दावे त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त 24 ते 48 तासांत निकाली काढण्याचे आहे.
EPFO ने बहुतांश प्रलंबित दाव्यांचा निपटारा पूर्ण केला असून, नव्या ऑटो-सेटलमेंट प्रणालीमुळे सुमारे 90 टक्के दावे कोणत्याही विलंबाशिवाय प्रक्रिया केले जात आहेत.
पूर्वी 7 ते 10 दिवस लागायचे
यापूर्वी ऑनलाइन PF दावा केल्यानंतर, KYC पूर्ण असतानाही रक्कम मिळण्यासाठी 7 ते 10 कामकाजाचे दिवस लागत होते. मात्र नव्या व्यवस्थेमुळे कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचार, शिक्षण, घर खरेदी किंवा इतर तातडीच्या गरजांसाठी PF ची रक्कम अधिक वेगाने मिळणार आहे.
लवकरच UPI द्वारे थेट PF जमा
EPFO ने आणखी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, पुढील सुमारे एका महिन्यात PF क्लेमची रक्कम BHIM UPI शी जोडलेल्या बँक खात्यात थेट जमा करण्याची सुविधा सुरू केली जाईल. त्यामुळे दावा मंजूर होताच रक्कम थेट खात्यात पोहोचेल आणि बँकिंग प्रक्रियेत होणारा विलंब कमी होईल.
EPF व्याजदर वाढणार का?
EPF वरील सध्याचा 8.25 टक्के व्याजदर वाढवला जाणार का, याबाबत विचारण्यात आले असता रमेश कृष्णमूर्ती यांनी सध्या कोणताही निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, EPFO ने 34 कोटींहून अधिक सदस्यांच्या खात्यात 8.25 टक्के दराने सुमारे ₹1.44 लाख कोटी व्याज जमा केले आहे.
EPFO च्या सेवा आणखी डिजिटल होणार
EPFO च्या मते, भविष्यात केवळ क्लेम सेटलमेंटच नव्हे तर नियोक्त्यांसाठीची अनुपालन प्रक्रिया (Compliance) अधिक सोपी केली जाईल. तसेच सदस्यांना अधिक वेगवान, पारदर्शक आणि डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. या बदलांमुळे लाखो कर्मचाऱ्यांना PF काढण्यासाठी होणारा विलंब कमी होऊन मोठा दिलासा मिळणार आहे.