PF Withdrawal Rule : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. नव्या नियमानुसार, पात्र पीएफ क्लेमचे ऑटो-सेटलमेंट आता अवघ्या 3 दिवसांत केले जाणार आहे. तसेच कोणत्याही वैध कारणाशिवाय पीएफ क्लेमच्या सेटलमेंटला 20 दिवसांपेक्षा अधिक विलंब झाल्यास संबंधित सदस्याला वार्षिक 12 टक्के दराने व्याज देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
EPFO च्या नव्या व्यवस्थेनुसार, ज्या सदस्यांचे KYC पूर्ण आहे आणि खाते अद्ययावत आहे, त्यांचे क्लेम ऑटो-प्रोसेसिंगद्वारे जलद मंजूर केले जातील. यामुळे पीएफची रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 5 लाखांपर्यंत
यापूर्वी ऑटो-सेटलमेंट सुविधेअंतर्गत केवळ 1 लाख रुपयांपर्यंत पीएफ विड्रॉलचा दावा करता येत होता. मात्र, नव्या नियमानुसार ही मर्यादा वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे अधिक सदस्यांना जलद सेटलमेंटचा लाभ मिळणार आहे.
20 दिवसांत सेटलमेंट बंधनकारक
EPFO ने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही परिस्थितीत पीएफ क्लेमची प्रक्रिया 20 दिवसांच्या आत पूर्ण करणे आवश्यक राहील. फॉर्म 19 आणि फॉर्म 10C अंतर्गत केलेल्या दाव्यांनाही हा नियम लागू राहणार आहे. ऑटो-सेटलमेंटसाठी पात्र दावे 3 दिवसांत पूर्ण केले जातील, तर आवश्यक पडताळणी असलेल्या प्रकरणांमध्ये 20 दिवसांच्या आत रक्कम खात्यात जमा केली जाईल.
विलंब झाल्यास मिळणार 12% व्याज
नव्या नियमांनुसार, कोणत्याही वैध कारणाशिवाय पीएफ क्लेमच्या सेटलमेंटला 20 दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास संबंधित खातेधारकाला वार्षिक 12 टक्के दराने व्याज दिले जाईल. यामुळे पीएफ दाव्यांची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
या बदलांमुळे देशातील कोट्यवधी पीएफ सदस्यांना जलद सेवा मिळण्यास मदत होणार असून, क्लेम प्रक्रियेत होणारा अनावश्यक विलंब कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.