मुंबई : प्रतिनिधी
Contract Employees Relief : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने 16 जुलै 2026 रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकाद्वारे 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदनिर्मितीची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले आहेत.
परिपत्रकानुसार, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्यात यावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांना संबंधित प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी 30 जून 2026 रोजी राज्य शासनाने 10 वर्षांपेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी 15,010 अधिसंख्य पदे निर्माण करण्यास तसेच त्यावरील आवश्यक खर्चास मान्यता देणारा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला होता. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आता पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
नवीन परिपत्रकात शासनाने संबंधित विभागांना आवश्यक कागदपत्रांसह स्वयंस्पष्ट प्रस्ताव एका महिन्याच्या आत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अधिसंख्य पदनिर्मितीची प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Contract Employees Relief
या निर्णयामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून, त्यांच्या सेवेसंदर्भातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून शासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.