Close Visit Mhshetkari

Thu. May 14th, 2026

मुंबई : EPFO New Rules 2026 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने खासगी पीएफ ट्रस्ट चालवणाऱ्या कंपन्यांसाठी नवे आणि कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार आता कोणतेही खासगी PF ट्रस्ट, EPFO ने जाहीर केलेल्या व्याजदरापेक्षा २ टक्क्यांहून अधिक व्याज कर्मचाऱ्यांना देऊ शकणार नाहीत.

EPFO च्या या निर्णयामुळे खासगी ट्रस्टमार्फत दिल्या जाणाऱ्या अवास्तव आणि अत्याधिक व्याजदरांना आळा बसणार आहे. काही ठिकाणी सदस्यसंख्या अत्यल्प झाल्यानंतर ३४ टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात असल्याचे EPFO च्या निदर्शनास आले होते. भविष्यात आर्थिक जोखीम निर्माण होऊ नये आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. EPFO New Rules 2026

८.२५ टक्के व्याजदर कायम

दरम्यान, EPFO ने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी पीएफवरील ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्राच्या वित्त मंत्रालयाकडे पाठविण्यात आला असून, मंजुरीनंतर देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याज जमा होणार आहे.

ऑडिट नियमांमध्येही मोठा बदल

नव्या नियमांनुसार, EPFO आता ‘रिस्क-बेस्ड ऑडिट’ प्रणाली लागू करणार आहे. म्हणजेच, नियमांचे पालन करणाऱ्या कंपन्यांचे दरवर्षी ऑडिट होणार नाही, तर ज्या कंपन्यांमध्ये जोखीम किंवा अनियमितता दिसून येईल त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

ट्रस्ट बंद करायचा असल्यास नवे नियम. EPFO New Rules 2026

जर एखाद्या कंपनीला स्वतःचा PF ट्रस्ट बंद करायचा असेल, तर संबंधित कंपनीला वर्तमानपत्रात सार्वजनिक नोटीस द्यावी लागणार आहे. तसेच सर्व सदस्यांची खाती EPFO कडे हस्तांतरित करणे बंधनकारक राहणार आहे.

कर्मचाऱ्यांसाठी काय परिणाम होणार?

या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या PF पैशांची सुरक्षितता अधिक मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे. अवास्तव व्याजाचे आमिष दाखवून भविष्यात निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटांना रोखण्याचा प्रयत्न EPFO कडून करण्यात येत आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना अधिक पारदर्शक आणि सुरक्षित PF व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *