मुंबई : Teacher Promotion GR Maharashtra : शालेय शिक्षण विभागाने शिक्षक संवर्गातून विविध पदांवरील पदोन्नतीसाठी कालबद्ध कार्यपद्धती निश्चित करणारा महत्त्वपूर्ण शासन निर्णय दि. 29 जुलै 2026 रोजी जारी केला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला गती मिळणार आहे.
शासन निर्णयानुसार, टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण असण्याबरोबरच सेवाप्रवेश नियमांनुसार आवश्यक अनुभव व इतर पात्रता धारण करणाऱ्या शिक्षकांचा पदोन्नतीसाठीच्या विचार क्षेत्रात समावेश करण्यात येणार आहे.
तसेच 10 जुलै 2026 पूर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे किंवा पदोन्नतीचे आदेश जारी झाले आहेत, त्या सर्व पदोन्नत्यांना संरक्षण देण्यात आले आहे.
याशिवाय, 14 मे 2026 रोजीच्या शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या पत्रामुळे पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या शिक्षकांना पुढील काळात पदोन्नती मिळाल्यास त्यांच्या पदोन्नती संवर्गातील सेवाज्येष्ठता ही निम्न संवर्गातील परस्पर ज्येष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, ऑगस्ट 2026 च्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, बैठकीच्या दिवशी उमेदवारांचा सेवाकाल, टीईटी/सीटीईटीसह इतर आवश्यक पात्रता विचारात घेऊन पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.