Close Visit MahaNews12

महाराष्ट्र कर्मचारी भरपाई नियम २०२६ चे प्रारूप जाहीर; १५ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविल्या.

महाराष्ट्र कर्मचारी भरपाई नियम २०२६ चे प्रारूप जाहीर; १५ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविल्या

पुणे : महाराष्ट्रातील कामगार क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध कामगार संहितांच्या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र कर्मचारी भरपाई नियम, २०२६ यांचे प्रारूप जाहीर केले आहे. संबंधित नियम राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यावर कामगार, औद्योगिक आस्थापना, कामगार संघटना तसेच नागरिकांकडून पुढील ३० दिवसांच्या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार करण्यात आलेले हे नियम अधिसूचनेद्वारे जनसामान्यांसाठी खुले करण्यात आले असून, त्यांना अंतिम स्वरूप देण्यापूर्वी संबंधित घटकांचे मत जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

१५ जुलै २०२६ अंतिम मुदत

या प्रारूप नियमांवर हरकती व सूचना नोंदविण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे. औद्योगिक आस्थापना, विविध कामगार संघटना, सामाजिक संस्था किंवा कोणतीही व्यक्ती आपले अभिप्राय लेखी स्वरूपात कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, सी-२०, ब्लॉक-ई, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१ येथे पाठवू शकते.

तसेच नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून mh.labourcodes.rules@gmail.com या अधिकृत ई-मेलद्वारेही हरकती व सूचना पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व हरकतींचा राज्य शासनाकडून सखोल विचार करण्यात येणार असून, त्यानंतरच नियमांना अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. राज्यातील औद्योगिक शांतता आणि कामगार कल्याण अधिक बळकट करण्यासाठी संबंधितांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!