Close Visit MahaNews12

EPS-95 पेन्शनवर धक्कादायक वास्तव! प्रत्येक दुसरा पेन्शनधारक 1,000 रुपयांपेक्षा कमी पेन्शनवर; EPFO अहवालातील खुलासा

EPS-95 पेंशन धारकांचे हाल ! प्रत्येक दुसरा पेन्शनधारक 1,000 रुपयांपेक्षा कमी पेन्शनवर; EPFO अहवालातील खुलासा

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या 2024-25 या वार्षिक अहवालातून EPS-95 पेन्शनधारकांबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अहवालानुसार, देशातील 81.48 लाख पेन्शनधारकांपैकी 36.82 लाख जणांना दरमहा 1,000 रुपयांपेक्षा कमी पेन्शन मिळत आहे. म्हणजेच जवळपास प्रत्येक दुसरा पेन्शनधारक अत्यल्प पेन्शनवर उदरनिर्वाह करत आहे.

याच अहवालात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या आश्रित मुलांना मिळणारी सरासरी मासिक पेन्शन केवळ 641 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सध्याच्या महागाईच्या काळात ही रक्कम अत्यंत अपुरी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

EPFO च्या आकडेवारीनुसार, 53.09 लाख सदस्यांना सरासरी 2,573 रुपये, तर 21.32 लाख आश्रितांना सरासरी 1,740 रुपये मासिक पेन्शन मिळते. मात्र मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना यापेक्षाही कमी पेन्शन मिळत असल्याने सामाजिक सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीसह विविध कर्मचारी संघटना किमान पेन्शन 7,500 रुपये प्रतिमहिना करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. यापूर्वी संसदीय समितीने किमान पेन्शन 3,000 रुपये करण्याची शिफारस केली होती. मात्र, याबाबत अद्याप केंद्र सरकारने अंतिम निर्णय घेतलेला नाही.

महागाई वाढत असताना अत्यल्प पेन्शनवर जीवन जगणाऱ्या लाखो पेन्शनधारकांसाठी हा अहवाल चिंतेचा विषय ठरत असून, किमान पेन्शन वाढीच्या मागणीला यामुळे पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!