मुंबई : NHM Contract Employees : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 14,010 पात्र कर्मचाऱ्यांचे सेवा समायोजन करण्यात येणार असून, त्यासाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
या निर्णयासाठी वार्षिक 1,153.60 कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार, 25 जून 2026 पर्यंत तांत्रिक खंड वगळून सलग 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना एकवेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे.
7 व्या वेतन आयोगानुसार वेतन
पात्र कर्मचाऱ्यांना समकक्ष पदाच्या वेतनश्रेणीतील किमान मूलभूत वेतन, महागाई भत्ता (DA) आणि प्रवास भत्ता (TA) मिळणार आहे. तसेच सध्या मिळणारे वेतनही संरक्षित राहणार आहे. पदांची समकक्षता निश्चित करताना कामाचे स्वरूप, जबाबदाऱ्या, शैक्षणिक पात्रता आणि सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीचा विचार केला जाणार आहे.
हे लाभ मिळणार नाहीत
या कर्मचाऱ्यांना पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या लागू असलेले रजेचे नियमच कायम राहतील.
अधिसंख्य पदांवर नवीन भरती नाही
शासनाने स्पष्ट केले आहे की, ही अधिसंख्य पदे व्यक्तीसापेक्ष असतील. संबंधित कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर, राजीनामा दिल्यानंतर किंवा सेवा संपुष्टात आल्यानंतर ती पदे आपोआप रद्द होतील. त्या पदांवर नवीन नियुक्ती केली जाणार नाही. तसेच अनुकंपा तत्त्वावरही नियुक्तीचा लाभ मिळणार नाही.
दरम्यान, भविष्यात अशा प्रकारची नियमितीकरणाची प्रकरणे निर्माण होऊ नयेत म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील मनुष्यबळ प्रामुख्याने बाह्यस्त्रोत किंवा सेवा करार पद्धतीने घेण्याचा निर्णयही शासनाने स्पष्ट केला आहे.