नवी दिल्ली : Family Pension : निवृत्त कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनबाबत आयकराचा महत्त्वाचा नियम आहे. अनेकांना स्वतःच्या पेन्शनप्रमाणे फॅमिली पेन्शनवरही ₹75 हजारांचे स्टँडर्ड डिडक्शन मिळते, असे वाटते. मात्र, प्रत्यक्षात फॅमिली पेन्शनची कर आकारणी वेगळ्या पद्धतीने केली जाते.
फॅमिली पेन्शन ही ‘Salary’ म्हणून नव्हे, तर ‘Income from Other Sources’ म्हणजेच ‘इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न’ म्हणून गणली जाते. त्यामुळे पगार किंवा स्वतःच्या पेन्शनवर लागू असलेली स्टँडर्ड डिडक्शनची तरतूद फॅमिली पेन्शनला तशीच्या तशी लागू होत नाही.
₹25 हजारांची वजावट नेमकी कशी?
आयकर कायद्याच्या कलम 57(iia) अंतर्गत फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांना विशेष वजावट मिळते. फॅमिली पेन्शनच्या एकूण रकमेच्या एक-तृतीयांश रकमेपर्यंत किंवा ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत, यापैकी जी रक्कम कमी असेल ती वजा करता येते.
नवीन करप्रणालीत ही कमाल मर्यादा ₹25,000, तर जुन्या करप्रणालीत ₹15,000 आहे. केंद्र सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात नवीन करप्रणालीतील ही मर्यादा ₹15 हजारांवरून ₹25 हजार केली होती.
उदाहरणातून समजून घ्या
समजा एखाद्या कुटुंबाला दरमहा ₹30 हजार फॅमिली पेन्शन मिळते. म्हणजे वर्षाला ₹3 लाख 60 हजार पेन्शन मिळते.
या रकमेच्या एक-तृतीयांश रक्कम ₹1 लाख 20 हजार होते. मात्र नवीन करप्रणालीत वजावटीची कमाल मर्यादा ₹25 हजार असल्याने ₹25 हजारांचीच वजावट मिळेल.
अशा प्रकारे ₹3 लाख 60 हजारांमधून ₹25 हजार वजा केल्यानंतर ₹3 लाख 35 हजार रक्कम कराच्या गणनेत विचारात घेतली जाईल. त्यानंतर इतर उत्पन्न आणि लागू रिबेटनुसार प्रत्यक्ष कर ठरतो.
₹75 हजारांचा स्टँडर्ड डिडक्शन मग कोणाला?Family Pension
इथेच सर्वाधिक गोंधळ होतो. निवृत्त कर्मचाऱ्याला मिळणारी स्वतःची पेन्शन ही पगाराच्या उत्पन्नाप्रमाणे करपात्र असते. त्यामुळे त्यावर संबंधित करप्रणालीनुसार स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळतो.
मात्र कर्मचाऱ्याच्या निधनानंतर पत्नी, पती किंवा पात्र आश्रिताला मिळणारी फॅमिली पेन्शन ‘इतर स्रोतांमधून उत्पन्न’ म्हणून गणली जाते. त्यामुळे त्यावर पगाराच्या उत्पन्नासाठी असलेली ₹75 हजारांची स्टँडर्ड डिडक्शन लागू होत नाही.
काही कुटुंबांना फॅमिली पेन्शनवर पूर्ण करमाफी
सशस्त्र दलातील कर्मचाऱ्याचा ऑपरेशनल ड्युटीदरम्यान मृत्यू झाल्यास, लागू अटी पूर्ण झाल्यावर कुटुंबाला मिळणारी फॅमिली पेन्शन कलम 10(19) अंतर्गत करमुक्त असू शकते.
तसेच अधिसूचित शौर्य पुरस्कार विजेत्याच्या कुटुंबाला मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनसाठीही कलम 10(18) अंतर्गत विशेष करमाफीची तरतूद आहे.
कर भरावा लागत नसला तरी ITR मध्ये माहिती द्यावी लागते
फॅमिली पेन्शन करपात्र उत्पन्नात येते याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष कर भरावाच लागेल असे नाही. एकूण उत्पन्न, उपलब्ध वजावटी आणि लागू रिबेटनुसार कराची रक्कम शून्यही होऊ शकते.
मात्र फॅमिली पेन्शन मिळत असल्यास ती आयकर रिटर्नमध्ये ‘इतर स्रोतांमधून उत्पन्न’ म्हणून दाखवणे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांनी स्वतःची पेन्शन आणि फॅमिली पेन्शन यांच्यातील करनियमांचा फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. विशेषतः ITR भरताना कलम 57(iia) अंतर्गत मिळणारी वजावट योग्य पद्धतीने क्लेम करणे महत्त्वाचे आहे.