प्रतिनिधी; विनोद डोंगर, दि : 29 मे 2026
बीड : “अपयश आलं म्हणून प्रयत्न थांबवायचे नसतात, तर अधिक जिद्दीने पुढे जायचं असतं,” हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गित्तेवाडी येथील युवक धर्मेश सांगळे यांनी. तब्बल ९ वर्षे सातत्याने विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत अखेर त्यांची ‘नाशिक जेल पोलिस’ पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
धर्मेश सांगळे यांनी २०१७ पासून स्पर्धा परीक्षांचा प्रवास सुरू केला. या काळात त्यांनी अनेक परीक्षा दिल्या. काही वेळा गुण कमी पडले, तर काही ठिकाणी अंतिम निवड होऊनही कागदपत्र पडताळणीमध्ये संधी हुकली. मात्र, प्रत्येक अपयशातून धडा घेत त्यांनी जिद्द कायम ठेवली. मुंबई पोलिस भरती, एमएसएफ, एसएससी जीडी, चालक पदाची परीक्षा अशा अनेक भरती प्रक्रियांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.
विशेष म्हणजे २०२२ मध्ये मुंबई पोलिस भरतीमध्ये निवड होण्याच्या उंबरठ्यावर असताना कागदपत्र पडताळणीमध्ये संधी हुकली होती. त्या धक्क्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. अखेर २०२६ मध्ये नाशिक कारागृह विभागात जेल पोलिस पदासाठी त्यांची निवड निश्चित झाली.
धर्मेश यांच्या यशामागे कुटुंबाचा पाठिंबा, सातत्यपूर्ण अभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला. ग्रामीण भागातील तरुणांसाठी त्यांचा संघर्ष प्रेरणादायी ठरत असून “जिद्द असेल तर यश निश्चित मिळते,” असा संदेश त्यांच्या यशातून मिळत आहे.