राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये होणार मोठे बदल! पारदर्शकता वाढवण्यासाठी समिती स्थापन; AI चाही होणार वापर. Employees Transfer Update
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे. सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली.
मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांतील सदस्यांचा समावेश असेल.
सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला प्रस्ताव Employees Transfer Update
भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खासगी विधेयकाद्वारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि शासकीय कामकाजातील विलंबाबाबतच्या कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली. बदल्या निश्चित कालमर्यादेत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा तसेच यासाठी अभ्यास समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.
फाईल निकाली काढण्यासाठी 45 दिवसांची मर्यादा
मुनगंटीवार यांनी मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या शासकीय फाईली 45 दिवसांच्या आत निकाली काढणे बंधनकारक करण्याचीही मागणी केली.
सरकारचा AI वापरावर भर
यावर उत्तर देताना मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, राज्य सरकारने 2005 पासून बदली प्रक्रिया नियमनासाठी कायदेशीर चौकट तयार केली असून वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी फाईल निकाली काढण्याच्या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर सुरू करण्यात आला आहे.
समिती देणार शिफारसी
सरकार स्थापन करणार असलेली समिती सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या अधिक पारदर्शक करण्यासाठी, शासकीय फाईलींचा जलद निपटारा करण्यासाठी आणि प्रशासनात सुधारणा करण्यासाठी आवश्यक शिफारसी करणार आहे. या शिफारशींनंतर राज्यातील बदली प्रक्रियेत महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Employees Transfer Update