EPFO चा मोठा निर्णय! UAN साठी आता वेबसाइट नाही; Activation आणि नवीन UAN फक्त ‘या’ App वरूनच
मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आपल्या ऑनलाइन सेवांमध्ये मोठा बदल केला आहे. गेल्या सात दिवसांपासून अपग्रेडेशनसाठी बंद असलेली EPFO ची अधिकृत वेबसाइट, UAN Member Portal आणि e-Passbook Portal पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या अपग्रेडेशननंतर UAN संबंधित दोन महत्त्वाच्या सेवा वेबसाइटवरून हटवण्यात आल्या असून, त्या आता UMANG App वरूनच उपलब्ध असतील.
EPFO च्या माहितीनुसार, UAN Activation आणि नवीन UAN क्रमांक (UAN Allotment) तयार करण्याची सुविधा आता UAN Member Portal वर उपलब्ध राहणार नाही. या दोन्ही सेवांसाठी कर्मचाऱ्यांना UMANG App चा वापर करावा लागणार असून, आधार आधारित Face Authentication अनिवार्य करण्यात आले आहे.
UAN सक्रिय करण्यासाठी काय करावे?
ज्या कर्मचाऱ्यांचा UAN अद्याप सक्रिय झालेला नाही, त्यांनी सर्वप्रथम मोबाईलमध्ये UMANG App डाउनलोड करावे. त्यानंतर EPFO Services मध्ये जाऊन ‘UAN Services Through Face Auth’ हा पर्याय निवडावा. पुढे ‘UAN Activation’ वर क्लिक करून आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी. प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर UAN सक्रिय होईल.
नवीन UAN क्रमांक कसा मिळणार?
नवीन UAN क्रमांक तयार करण्यासाठीही आता UMANG App चाच वापर करावा लागेल. त्यासाठी ‘UAN Allotment and Activation‘ हा पर्याय निवडून आवश्यक माहिती भरावी. मोबाईल क्रमांकाची OTP द्वारे पडताळणी केल्यानंतर आधार आधारित Face Authentication पूर्ण करावे. त्यानंतर नवीन UAN क्रमांक जारी केला जाईल.
UAN विसरलात? आता प्रक्रिया झाली सोपी
EPFO ने UAN Retrieval ची प्रक्रियाही अधिक सुलभ केली आहे. UAN क्रमांक आठवत नसेल तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाकल्यानंतर UAN क्रमांक पुन्हा मिळू शकतो.
या गोष्टी असणे आवश्यक
UAN संबंधित सेवा वापरण्यासाठी आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच बँक खात्याची माहिती तयार ठेवावी लागेल. काही प्रकरणांमध्ये मृत्यू प्रमाणपत्र, बँक पासबुक, कॅन्सल चेक, जन्मतारखेचा पुरावा यांसारखी कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करावी लागू शकतात.
EPFO च्या या निर्णयामुळे UAN संबंधित सेवा अधिक सुरक्षित आणि डिजिटल होणार असून, आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनमुळे फसवणुकीच्या प्रकारांवरही आळा बसण्यास मदत होणार आहे. कर्मचाऱ्यांनी आता UAN संबंधित कामांसाठी वेबसाइटऐवजी UMANG App चा वापर करावा, असे EPFO ने स्पष्ट केले आहे.