मोठी बातमी! ‘लाडकी बहीण’ योजनेची रक्कम वाढणार? पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचा मोठा सल्ला
मुंबई | प्रतिनिधी
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ योजनेबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (EAC-PM) सादर केलेल्या ताज्या चर्चापत्रात महिलांसाठी थेट बँक खात्यात आर्थिक मदत देणाऱ्या योजनांचे सकारात्मक परिणाम अधोरेखित करत, वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजांचा विचार करून या योजनांतील मदतीच्या रकमेचा वेळोवेळी पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
सध्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. मात्र, ही रक्कम आजच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पुरेशी आहे का, याचा आढावा घेऊन आवश्यक असल्यास त्यात बदल करण्याची गरज समितीने व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात योजनेच्या लाभाच्या रकमेत वाढ होण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना
समितीच्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. महिलांच्या बँक खात्यातील सरासरी शिल्लक रक्कम 84 टक्क्यांनी वाढली, तर त्यांच्या मासिक खर्चात 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ महिलांच्या हातात पैसा आल्याने त्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजांवर अधिक खर्च करू लागल्या आहेत.
याशिवाय, महिलांच्या उत्पन्नाचा सकारात्मक परिणाम संपूर्ण कुटुंबावर दिसून आला आहे. कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या बँक खात्यातील शिल्लकही 23 टक्क्यांनी वाढली, तर त्यांच्या आर्थिक तणावात घट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
शिक्षण, आरोग्य आणि डिजिटल व्यवहारांना प्राधान्य
अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, महिलांनी मिळालेल्या आर्थिक मदतीचा वापर प्रामुख्याने मुलांचे शिक्षण, आरोग्यसेवा, वैद्यकीय उपचार आणि जीवनमान सुधारण्यासाठी केला आहे. महाराष्ट्रात शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चात विशेष वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
तसेच लाभार्थी महिलांकडून UPI आणि डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ झाले आहेत.
इतर राज्यांच्या योजनांचाही अभ्यास
या चर्चापत्रात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिशा सरकारची सुभद्रा योजना यांचे तुलनात्मक मूल्यमापन करण्यात आले आहे. दोन्ही योजनांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.
रक्कम वाढणार का?
सध्या लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचा कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने महागाईच्या पार्श्वभूमीवर लाभाच्या रकमेचा पुनर्विचार करण्याची शिफारस केल्यामुळे भविष्यात सरकार या विषयावर निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.