Close Visit MahaNews12

महाराष्ट्रात या ठिकाणी पावसाचा कहर! तर मुंबई, ठाणे, कोकणात रेड अलर्ट; अनेक भाग जलमय.

महाराष्ट्रात या ठिकाणी पावसाचा कहर! तर मुंबई, ठाणे, कोकणात रेड अलर्ट; अनेक भाग जलमय.

मुंबई : Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून गेल्या 24 तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. अनेक सखल भागांत 2 ते 3 फूट पाणी साचल्याने रस्ते वाहतूक, लोकल सेवा आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईतील दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, अंधेरी, गोरेगाव, वरळी आणि चेंबूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अंधेरी सबवे, वीरा देसाई रोड तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील काही भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक संथ झाली आहे.

संध्याकाळच्या वेळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर ते ठाणे दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

वसई-विरार परिसरातही पावसाचा जोर कायम असून वाघराळ पाड्यात पाण्याच्या प्रचंड प्रवाहात 3 दुचाकी आणि 2 कार वाहून गेल्या. सुदैवाने एका कारचालकाने वेळेत बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. नालासोपारा आणि कल्याणमध्येही अनेक भाग जलमय झाले असून काही शाळांमध्ये पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही तासांत 82.76 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंब्रा-शीळ मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे हा रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

दरम्यान, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!