Close Visit MahaNews12

MSRTC भरतीबाबत मोठा खुलासा; वर्ग-3, वर्ग-4 पदांसाठी सध्या कोणतीही सरळ सेवा भरती नाही

मुंबई : प्रतिनिधी

MSRTC Recruitment 2026 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) वर्ग-3 आणि वर्ग-4 पदांच्या भरतीबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देत महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. महामंडळामार्फत सध्या कोणतीही सरळ सेवा भरती प्रक्रिया प्रस्तावित नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महामंडळाने म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वर्ग-3 आणि वर्ग-4 पदांची भरती लवकरच होणार असल्याचे संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र, या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून ते पूर्णपणे दिशाभूल करणारे आहेत.

प्रसिद्धीपत्रकानुसार, विविध विभागांकडून काही रिक्त पदांची माहिती मागविण्यात आली होती. ही प्रक्रिया केवळ कार्यालयीन व प्रशासकीय कामकाजासाठी असून तिचा नवीन भरतीशी कोणताही संबंध नाही.

महामंडळाने स्पष्ट केले आहे की, सध्या वर्ग-3 आणि वर्ग-4 पदांसाठी कोणतीही सरळ सेवा भरती प्रस्तावित अथवा सुरू नाही. त्यामुळे उमेदवारांनी सोशल मीडियावरील अप्रमाणित पोस्ट, संदेश किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. MSRTC Recruitment 2026

भविष्यात भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय झाल्यास त्याबाबतची माहिती महामंडळाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे तसेच अधिकृत संकेतस्थळ आणि अधिकृत माध्यमांद्वारेच जाहीर करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, भरतीच्या नावाखाली चुकीची माहिती पसरविणाऱ्या व्यक्तींविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महामंडळाने दिला आहे. तसेच नागरिक आणि इच्छुक उमेदवारांनी केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!