मुंबई : Maharashtra Government Circular : राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा व्यवस्थापनाबाबत वित्त विभागाने 15 एप्रिल 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाद्वारे नैमित्तिक (किरकोळ) रजा आणि बदली रजा मंजूर करण्याच्या प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, सर्व शासकीय कार्यालयांना त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परिपत्रकानुसार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन उपस्थिती तसेच रजा वापराबाबत यापूर्वीही विविध सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही अधिकारी आणि कर्मचारी एका कॅलेंडर वर्षात आठपेक्षा अधिक नैमित्तिक रजा घेत असल्याचे तसेच गट ‘ब’ (राजपत्रित) संवर्गातील काही अधिकारी बदली रजा मंजूर करण्याची मागणी करत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने एका कॅलेंडर वर्षात आठ नैमित्तिक रजा पूर्ण केल्यानंतर पुढील प्रत्येक एक दिवसाच्या अनुपस्थितीसाठी, त्यांच्या अर्जानुसार अर्जित रजा (Earned Leave) मंजूर करण्यात येईल. मात्र, संबंधित अधिकाऱ्याच्या किंवा कर्मचाऱ्याच्या अर्जित रजेच्या खात्यात शिल्लक रजा उपलब्ध असणे आवश्यक राहील.
याशिवाय बदली रजेसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. परिपत्रकानुसार गट ‘ड’ आणि गट ‘ब’ (अराजपत्रित) संवर्गातील कर्मचारी वगळता इतर सर्व अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदली रजा अनुज्ञेय राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. Maharashtra Government Circular
या निर्णयामुळे रजा मंजुरीची प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध होण्यास मदत होईल, तसेच कार्यालयीन उपस्थिती आणि प्रशासकीय कामकाजावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होईल. संबंधित सर्व विभागांनी वित्त विभागाच्या या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. :::