मुंबई : Government Employees Salary Hike राज्यातील स्वीय सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
वेतन समानीकरण (चौथा वेतन आयोग) अहवालानुसार, सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयांमध्ये स्वीय सहाय्यक संवर्गाची पदे निर्माण करून त्यांना मंत्रालयीन निवडश्रेणी लघुलेखकांची वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली होती.
त्यानंतर वेतनत्रुटी निवारण समिती 2024 अर्थात खुल्लर समितीच्या शिफारशीनुसार वित्त विभागाने 2 जून 2025 रोजी शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ तसेच पोलिस महासंचालक कार्यालयातील स्वीय सहाय्यक संवर्गाला पूर्वीची एस-16 (44900-112400) वेतनश्रेणी रद्द करून सुधारित एस-17 (47600-151100) वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली.
याच धर्तीवर आता सामान्य प्रशासन विभागाच्या 18 डिसेंबर 1995 च्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांमधील स्वीय सहाय्यक संवर्गालाही एस-16 ऐवजी एस-17 वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे.
हा निर्णय वित्त विभागाच्या 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या तरतुदींच्या जशाच्या तसे अंमलबजावणीद्वारे घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक स्वीय सहाय्यक कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे.





