ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय; निवाऱ्याचा हक्क अबाधित राहणार, नवीन GR आला. Senior Citizen Amenities in Housing
मुंबई: Senior Citizen Amenities in Housing : महाराष्ट्र राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण–2013 प्रभावीपणे राबवण्यासाठी गृहनिर्माण विभागाने 15 डिसेंबर 2025 रोजी महत्त्वाची मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या धोरणानुसार, वृद्धापकाळात निवाऱ्याची हमी देणे हा ज्येष्ठ नागरिकांचा मूलभूत अधिकार असून तो कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (SRA) ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन आढावा घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, ज्येष्ठ रहिवाशांच्या इमारत पुनर्विकासासंदर्भातील तक्रारी सोडवण्यासाठी SRA स्तरावर कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
पुनर्विकास प्रकल्प राबविताना ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, SRA अंतर्गत सर्व निवासी, वाणिज्य व इतर संकुलांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोयी-सुविधा देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षित निवास व सन्मानजनक जीवनाकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.






